आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ताणतणाव का निर्माण होतात? कारण आपलं आयुष्य अनेक अपेक्षांनीच आपण गुंतागुंतीचं करून ठेवत असतो. एका वक्त्याने फारच सुंदर उदाहरण दिले .
समजा तुम्ही एका मेळाव्यात सहभागी झाला अहात. तुमचे अनेक मित्रही तिथे आले आहेत. एका टेबलावर बासुंदीचे कप भरून ठेवले आहेत. त्यातील काही कप सुंदर कलाकुसर केलेले आहेत तर काही साधेच. तुम्हाला त्या बासुंदीचा आस्वाद घेण्यासाठी यजमानांनी सांगितले, तेव्हा तुम्ही कोणता कप हाती घेतला? तुमच्यापैकी 99% लोकांनी पटकन सुंदर कलाकुसर केलेले कप उचलले. आणि साधे कप मागे राहिले. यावरून काय निष्कर्ष निघतो?
तुम्हाला तुमच्यासाठी नेहमी चांगलं तेच हवं असतं. हे ठीक आहे. पण हेच तुमच्या तणावाचं कारण असतं, हे तुमच्या लक्षातही येत नाही. तुम्ही ज्याचा आस्वाद घेता त्या बासुंदीच्या चवीचा कप चांगला-वाईट असण्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही कलाकुसरवाला सुंदर कप घेतला काय किंवा साधाकप घेतला त्यातील बासुंदीची चव तीच रहाणार असते. महत्वाचं काय तर बासुंदी. पण तिच्यापेक्षा तुम्हाला कपांनीच अधिक भुलवलं आणि तुम्ही कपांकडे धावलात. इतकंच नाहीतर प्रत्येकाची नजर दुसर्याला कुठला कप मिळाला याकडे होती. आणि आपण सुंदर कप पटकावल्याचं समाधान तुमच्या चेहर्यावर दिसत होतं.
लक्षात घ्या, आयुष्य हे बासुंदीसारखं आहे आणि तुमची नोकरी, पैसा, समाजातलं स्थान हे कपासारखं. ती फक्त साधनं आहेत तुमचं आयुष्य तोलून धरणारी. हे कप ना तुमची वैचारिकता बदलू शकत, ना तुमच्या आयुष्याला आकार देतात. पण अनेकदा काय होतं की आपण कपांकडेच जास्त लक्ष देतो. आणि प्रत्यक्ष आयुष्याचा...बासुंदीचा आस्वाद घेण्याकडे दुर्लक्ष करतो. आनंदी माणसाकडे सगळं काही चांगलं असतं असं नाही. पण सगळ्या काहीतून तो चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो हे नक्की.म्हणून म्हणतो, साधेपणानं जगा, उदारपणे प्रेम करा, ममत्वाने बोला आणि बासुंदीचा आस्वाद घ्या.
😊

0 टिप्पण्या