असं म्हणतात, आयुष्यात चांगली माणसं नशिबाने मिळतात. कारण, तुमचं आयुष्य जेव्हा एखाद्या महत्वाच्या वळणावर उभं असतं तेव्हा योग्य सल्ला देणारी, प्रसंगी कान पकडणारे चांगली माणसं ही असणं आवश्यक असतं. कसं आहे, व.पु. म्हणतात, " काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडते पण रक्ताच्या नात्यात ओढा सापडत नाही.." काही नात्यांना नाव नसतं. पण अडचणीच्या वेळी सर्वात आधी आठवण त्याच व्यक्तीची होते. आजचा माझा लेख हा कोणत्याही वैचारिक विषयावर नाही. तर सकाळी तुमच्या हातात चहाचा कप आणि मस्त गप्पा. अशा पद्धतीचा आहे. जसं व.पुं.नी प्रत्येक वयाच्या व्यक्तीला आयुष्य जगताना उपयोगी पडतील असे विचार मांडले आहेत, हे विचार वाचून आपण एक नवीन जन्म घेतला आहे आणि कितीही अडचणी आल्या तरी त्या सोडवून जगण्याचा महोत्सव साजरा करायचा आहे, हे लक्षात येते. इथे सुद्धा अनेक माणसे आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया वाचून माझ्यातली मी मला नव्याने समजली. आपण चुकतो कुठे तर एखादं संकट आलं तर आपण खचून जातो. ज्यामुळे मनात वाईट विचार येऊ लागतात. तुमच्या पाठीशी जेव्हा घरातले असतात तेव्हा तुम्ही एकाकी नसता पण, परत व.पु. म्हणतात तसं गर्दीतलं एकाकीपण फार भयानक असतं..
या ग्रुपचं मला खूप कौतुक वाटतं. कारण, हल्ली वाचन हे खूप कमी होत चालले आहे. इथे दररोज व. पु. विचारांच्या पोस्ट वाचल्या की कळतं, या लेखकाने जे काही लिहिले आहे ते किती वास्तवाला धरून आहे. कसं आहे, तुमची जवळची व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यातून निघून जाते तेव्हा निश्चितच वाईट वाटते. कारण, प्रश्न भावनांचा असतो. पण त्याच बरोबरीने हाही विचार करायला हवा की हे नातं नेमकं का तुटलं? चूक कोणाची? जर चुक आपली नसेल तर ती नियतीची इच्छा होती असं म्हणावं लागतं, तसंच तुम्ही माणूस ओळखायला चुकलात हे वास्तव नाकारता येत नाही. हे कळलं म्हणजे लेखकांना जे सांगायचे आहे ते सार्थकी लागले. हाच गुण आपल्या व.पुं. मध्ये आहे. उगीचच नाही ते म्हणत, " ज्याला लेखणीतून संवाद साधता येतो त्याला मी लेखक समजतो.." वैचारिक देवाणघेवाण ही कोणत्याही विषयावर होऊच शकते ना!! जेव्हा आपल्या अंगात असलेले सुप्त गुण समोर येतात तेंव्हा कळतं की अरेच्चा हे पण आपण करु शकतो की!! जे माझ्या बाबतीत घडलं. मी लिहिते त्यामुळे खूप जणांना वाटतं की माझ्याकडे एवढा अनुभव कसा? तर त्याचं उत्तर म्हणजे जे मी समाजात, माझ्या घरात बघते,अनुभवते ते मी तुमच्याशी शेअर करते. याला पूर्णत्व मिळतं ते व.पुं.च्या विचारांमुळे. ते अप्रत्यक्ष अस्तित्व आपल्या सर्वांच्या सोबत असतेच.
आज खूप लिहित नाही, कारण गप्पा मारत बसलं की कामाचा खोळंबा होतो. पण एक आहे, माझ्यात असलेल्या लिखाणाच्या छंदाला आपण सर्व जो काही सुंदर प्रतिसाद देता त्यामुळे मी नकळत सुखावते. व.पु. तर आहेतच. पण, माझ्या लेखावर आलेले आपले काही अनुभव वाचताना जो काही वैचारिक संवाद होतो तो जास्त ऊर्जा देतो. असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या.. तसंच, लिखाणात काही बदल हवा असल्यास, चूक झाल्यास नक्कीच सांगा.. आपली भेट होतच राहिल..
.. मानसी देशपांडे
विरार.
0 टिप्पण्या