व.पु. म्हणतात, " दिंडीतील सर्व वारकरी बघा, एकमेकांसारखे दिसतात कारण भाव हा सारखाच असतो.." आषाढी वारीच्या वेळी ज्यांना पायी जाणे शक्य होत नाही ते देखील याच लाल परीने प्रवास करतात. त्या वेळी तर ते वातावरण देखील भक्तीमय होते. सुरुवातीला कुठे शिवनेरी, शिवशाही अस्तित्वात होती हो? मला व.पुं.चा अजून एक विचार मनात येतो, " प्रवास म्हटलं की असं होतं, एका प्रवासाची हकीकत सांगताना दुसऱ्याच प्रवासातलं आठवायला लागतं.." तुम्हाला सांगू, प्रवास म्हटलं म्हणजे आठवणी आल्या आणि आठवणी या चिरंतन असतात. त्या काळात, मुलगी बघायला जाण्यासाठी माझ्या मते लाल परी किंवा ट्रेन हाच पर्याय असावा. याच लाल परीतून जाताना ज्यांना आपली आयुष्याची जोडीदार मिळाली ते तर हा प्रवास विसरुच शकत नाही. किंवा, कोकणात राहायला आलेली माहेरवाशीण जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा हिच लाल परी तिला सुखरूप पोहोचवते..
हल्ली ही आपली लाल राणी खरंच दुरापास्त होत चालली आहे. जेव्हा कधी ही लाल परी दिसते तेव्हा क्षणभर डोळे पाणावतात. कारण, ज्यांनी याने प्रवास केलेला आहे ते हिला कधीच विसरू शकत नाही. आज या आठवणी भूतकाळात जमा झाल्या. म्हणून तर व.पु. बरोबर लिहितात, " अश्रू हे कितीही प्रामाणिक असले तरी त्यांच्यात भूतकाळ परत आणण्याची ताकद नसते.." मी तरी अजून कोकण पाहिला नाही पण, जेव्हा कधी लाल परी दिसते तेव्हा मन तिच्यासोबत कोकणात कधी जातं तेच कळत नाही. भरपूर हिरवीगार झाडी, अंगावर काटा आणणारा गार वारा, आणि सोबत अनेक प्रवासी.. खरंच, काही प्रवास किंवा प्रवासाची माध्यमं कधीच विसरता येत नाही. आता मध्यंतरीच डबल डेकर देखील बंद झाल्या. एक गोष्ट मात्र नक्की, ज्या गोष्टीमुळे माणूस उभा राहतो ती तो कधीच विसरू शकत नाही.. शेवटी ही लाल परी आपल्या महाराष्ट्राची आहे हो!!
आज या लाल परी विषयी लिहावेसे वाटले कारण, मन जेव्हा अशा जुन्या पण रम्य आठवणींमध्ये हरवून जातं तेव्हा ते दिवस आठवून नकळत चेहऱ्यावर एक हास्य उमटतं. त्या बसवर लावलेली गावाची पाटी जणू काही आपल्याला बोलावत असते की चला जिथे जायची तुम्हाला ओढ लागली आहे तिथेच मी देखील येत आहे.मी तर असं म्हणेन, या लाल परीने आपले व.पु. म्हणतात तसं, अनेकांची ओंजळ आनंदाने भरली आहे. ही लाल परी कितीही माणसांनी भरलेली असली, अगदी बसायला देखील जागा मिळाली नाही तरीही तिच्या सोबतचा प्रवास हा अविस्मरणीय व पदरात अनेक सुंदर आठवणी देतोच. म्हणून तर, " गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी.."
.. मानसी देशपांडे
विरार.
0 टिप्पण्या