एकवेळ आईबाबा होणं सोप्प पण मुलांचे पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे. उत्तम पालक होण्याचे कुठलेही विशिष्ट नियम अथवा पध्दती नाहीत, त्यामुळे प्रत्येक पालक आणि त्यांचे मुलं हे एक स्वतंत्र आणि वैशिष्टयपूर्ण व्यक्तीमत्व आहे. बाळ राजाच्या आगमना पासूनच त्याचे आईबाबा उत्तम पालक होण्यासाठी प्रयत्न सुरु करतात.
प्रत्येक पालकांना त्यांचे संगोपन परिपूर्ण व्हावे असे वाटते. परंतु त्यांना दररोज मिळणाऱ्या नवनवीन सूचनांमुळे त्यांना पालकत्वाबाबत संभ्रम निर्माण होऊ लागतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पालकत्वाबद्दल शंका असेल तर तुम्ही सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांच्या सूचना जरूर वाचा. त्यांनी 'हाऊ आय थॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज' या पुस्तकात आयुष्याशी संबंधित अनेक अनुभव सांगितले आहेत. मुलांचे संगोपन करण्याचा योग्य मार्गही त्यांनी सांगितला आहे. मुलांच्या संगोपनात मोलाची भर घालण्याचा मुद्दा त्यांच्या प्रत्येक पुस्तकात नक्कीच आढळतो, त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यात सहज अंगीकारून तुमच्या मुलांना चांगले जीवन देऊ शकता. यासोबतच तुम्ही तुमच्यातील संबंध सुधारू शकता. त्याच्या पालकत्वाच्या सल्ल्याबद्दल जाणून घेऊया.
मुलांसमोर एक उदाहरण सेट करा :
जन्मल्यानंतर मुलांना बोलता येत नसतं ते रडत असतात. पण, त्यांचे डोळे आणि कान यावर जे पडतं, जे दिसतं त्याला ते प्रतिसाद देत शिकत असतात. अनेक मुलं बघून शिकतात. म्हणून तुमच्या मुलांनी प्रेमळ, दयाळू व्हावं असं वाटत असेल तर तुम्हीही तसे वागा. त्यांच्या समोर तुमचं उदाहरण सेट करा.
मुलांना वाचायला प्रवृत्त करा :
मुलांच्या चांगल्या विकासासाठी पुस्तके खूप महत्त्वाचे काम करतात. पुस्तकं आहेत म्हणून आपण घडलो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एक सुंदर संदेश दिला आहे. ते म्हणतात की, "तुमच्याकडे दोनच रूपये शिल्लक असतील तर त्यातील एक रूपयाचे जेवण करा आणि एका रूपयाचे पुस्तक विकत घ्या. कारण, पुस्तकं जगणं समृद्ध करतात." म्हणून त्यांना लहानपणा पासून बौद्धिक चर्चेत सामील करून घ्या आणि वाचन आणि आयुष्यभर प्रेमाने शिकण्यास प्रोत्साहित करा.
सहानुभूती आणि करुणा :
लहान मुलं हट्टी असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट हवी असते. मुलांना हट्टी बनवू नका. त्यांना योग्य वळण लावायचं आहे तर त्यांच्यासाठी थोडं स्ट्रिक्ट व्हा. आपल्या मुलांना इतर सवंगड्या बद्दल प्रेम, सहानुभूती आणि करुणा शिकवा. त्यांना स्वयंसेवा करण्यास प्रवृत्त करा आणि कोणत्याही सामाजिक समस्यांवर चर्चा किंवा स्वयंसेवक म्हणून काम करा.
साधेपणा आणि नम्रतेचे महत्त्व :
मुलं हट्टी आहेत तर त्यांच्याकडून एखादी गोष्टी काढून घेतली तर ते उद्धटपणे वागू शकतात. तुम्हाला उलट उत्तर देऊ शकतात. त्यामुळे मुलांना नम्रपणे बोलणं शिकवा. मुलांमधील उद्धट वागण्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजावून सांगा.
जबाबदारी प्रोत्साहन :
मुलांना त्यांच्या वयानुसार जबाबदारीची जाणीव करून द्या. त्यांना निर्णय घेण्यास प्रोत्साहित करा, ज्यामुळे त्यांच्यात आत्मनिर्भरता आणि जबाबदारीची भावना विकसित होईल.
कौतुक करायला शिकवा :
जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करायला मुलांना शिकवा. त्यांच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, जे त्यांना सकारात्मक दृष्टीकोन आणि नम्रता विकसित करण्यात मदत करेल.
लेखक - दिनेश विष्णु ढोले 98503 25069..पुणे
━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━
Email Us - yashachamantra@gmail.com
0 टिप्पण्या