आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in गावचं ओसाड घर ... Gavche osad ghar | Marathi MP3 Audiostory

गावचं ओसाड घर ... Gavche osad ghar | Marathi MP3 Audiostory


www.FMmarathi.in


संध्याकाळी शशी ऑफिसमधून घरी आला, फ्रेश होऊन आरामखुर्चीत निवांत बसला. बायकोने चहा आणून दिला आणि सोबत एक टपाल दिलं. ते देऊन त्याची बायको देवळात गेली. चहा घेऊन शशीने टपाल उघडले. आता व्हाट्सअप आणि मोबाईलच्या जगात टपाल कस आलं, म्हणून त्याने कुतूहलाने पाकीट उघडले.


पत्र गावाहून कोकणातून आलं होतं. गावी त्यांच्या बाजूला राहणाऱ्या पंतांच पत्र होतं .. "शक्य तितक्या लवकर गावी या", असं पत्रात लिहिलं होतं.


पत्र वाचून शशी विचार करत बसला .. असं काय घडलं असेल, की पंतांनी 'लगेच या' म्हणून सांगितलं ..


बायको आल्यावर त्याने तिला पत्राबाबत सांगितले .. तिलाही आश्चर्य वाटले .. कित्येक वर्षांपासून गावाशी काही संबंधच नाही .. मग अचानक .. पण काही महत्वाचं असल्याशिवाय पंत पत्र पाठवणार नाहीत .. हे ही त्यांना माहित होत .. जोडून सुटी येतच होती .. एरव्ही जोडून येणाऱ्या सुटीला सगळे शहापुरला जायचे (सेकंड होम) .. रात्री जेवताना हा विषय निघाला आणि सगळ्यांनी एकमताने पंतांच्या पत्रानुसार कोकणात जायचं ठरवलं .. शशीने पंतांना तसं कळवलं आणि निघायची तयारी झाली ..


सकाळच्या ट्रेनमध्ये सगळे बसले .. तसं तर मुलं अगदी लहान असताना शशी त्यांना घेऊन कोकणात गेला होता .. मुलगा तीन वर्षांचा आणि मुलगी सहा महिन्यांची होती .. त्यानंतर त्याचं जाणं नाहीच झालं .. आता मुलं मोठी झाली .. आता मुलगा वीस वर्षाचा आणि मुलगी सतरा वर्षाची झाली होती .. त्यामुळे मुलांचा उत्साह खूप होता .. इतक्या वर्षांनी दिसणारं निसर्गसौंदर्य मुलांसोबत शशीसुद्धा डोळ्यात साठवत होता.


स्टेशनला उतरून रिक्षाने ते गावात गेले आणि आपल्या घरासमोर रिक्षा थांबवली .. शशीची बायको मीरा, घर झाडायला लागणार या तयारीनेच आली होती .. त्यांना पाहून ओसरीवर बसलेले पंत पुढे आले .. शशिला त्यांनी ओळखले .. केसात चांदी फुललेली, डोळ्याला जरा जाड भिंगाचा चष्मा लागला होता, पण मुंबईची टापटीप मात्र दिसत होतीच.


पंत पुढे आल्यावर मीराने त्यांना वाकून नमस्कार केला .. शशीनेही केला .. शशीने मुलांची ओळख करून दिली .. मुलांनीही पंतांना नमस्कार केला .. मुंबईत राहून बाळबोध संस्कार टिकवून ठेवलेत, म्हणून पंत सुखावले .. चावी पंतांकडे असायची म्हणून पंतांनी घर स्वच्छ करून ठेवले होते .. पण त्यांना घरात राहू दिले नाही .. त्यांना पंतांनी आपल्या घरात रहायला सांगितले .. पंतांचा शब्द शशी टाळू शकत नव्हता.


आपल्या घरात पंतांनी एका खोलीत त्यांची चोख व्यवस्था केली .. पंतांच्या पत्नीनेही शशीच्या कुटुंबाचे प्रेमाने स्वागत केले .. पंत स्वतः ८० वर्षाचे होते आणि त्यांची पत्नी (काकू) ७५ वर्षाची होती .. पण अजूनही चेहरा टवटवीत दिसत होता .. वयाचा थकवा जाणवत असला तरी वयाची धास्ती चेहऱ्यावर दिसत नव्हती.


जेवणं झाल्यावर अंगणात सगळे एकत्र बसले होते .. अंगणावर नारळीच्या झावळ्यांची सावली केली होती .. त्यामुळे छान थंड वाटत होतं. पंतांनी विषयाला हात घातला .. शशीला सांगितले, "तुझ्या बाबांनी बांधलेलं हे तुमचं घर खूप जुनं झालंय, पडझड झालीय आतून, काही खोल्यांच्या भिंती तुटल्यात, पडायला झाल्यात, तुझ्या बाबांनंतर घर तू माझ्यावर सोपवलस आणि मुंबईला गेलास, पुन्हा इकडे पाहिलंच नाहीस, आठ पंधरा दिवसांनी एकदा मी आपलं सगळं आवार साफ करून घेतो, तुमची झाडं माड राखतो, जमेल तसं घरसुद्धा दुरुस्त करत होतो, पण आता माझंही वय साथ देत नाही, आणि मी तरी किती दिवसांचा सोबती..!! पण आता तुमचा हा वाडा पडायला आलाय, यंदाचा पावसाळा हा वाडा काढणार नाही .. तो जर कोसळला तर तुझ्या बापाला आवडणार नाही, त्यामुळे आता जरा तुम्हीच मनावर घ्या आणि घर बांधा, निदान आईबापाची आठवण म्हणून तरी बांधा .."


"वहिनी होत्या तेव्हा रोज अंगणात सडा टाकून रांगोळी काढायच्या, तुळशीवृंदावन कसं छान सजलेलं असायचं .." शशीच्या आईच्या आठवणीने काकूंनी डोळ्याला पदर लावला ..


समोरून येणारे जाणारे सगळे पंतांना नमस्कार करून जात होते .. दादांचा मुलगा शशी आणि त्याच कुटुंब आलंय हि बातमी सगळ्या गावात एव्हाना पसरली होती .. सगळे येऊन भेटत होते, चौकशी करत होते .. शशीच्या बाबांना गावात खूप मान होता .. तोच मान आज त्याला मिळत होता ..


मुलांना या गोष्टी नवीन होत्या .. अभिमानाने आणि कुतूहलाने ती दोघे हे सगळं पहात होते .. संध्याकाळी उन्हं उतरल्यावर सगळे आपल्या जागेत गेले .. एकमजली चौसोपी वाडा, कोसळण्याच्या तयारीत .. पण वाड्याच्या भोवती पंतांनी झाडं मात्र जपली होती .. नारळी, केळी, पेरू, पपई, आंबा, सुपारी, साग, ऐन वेगवेगळी झाडं सगळीकडे पसरली होती .. काही ठिकाणी मस्त भाज्या तरारल्या होत्या .. झेंडू, शेवंती, अबोली, तगर, अनंत, काकडा, यांसारखी थोडी फुलझाडं सुद्धा जगवली होती .. चाफ्याचा सुगंध दरवळत होता .. शशीच्या बाबांनी किती आवडीनं चाफा लावला होता अंगणात .. बाहेर फिरून सगळे वाड्यात गेले .. वाडा अतिशय जीर्ण झाला होता .. शशीचं मन भूतकाळात गेलं .. बाबांनी किती हौसेने हा वाडा बांधला .. त्यावेळी गावात सगळ्यात मोठा आणि प्रशस्त वाडा त्यांचाच होता .. शशीचं सर्व शिक्षण गावीच झाले .. घरच्यांच्या आग्रहाने लग्न सुद्धा गावच्याच मुलीशी केले .. पण त्याची त्याबद्दल काही तक्रार नव्हती .. मिराने त्याचा संसार सुखाचा केला होता .. मग पोटापाण्याच्या समस्येने मुंबई दाखवली .. नंतर आईवडिलांचे निधन झाले .. हळूहळू त्याने गाव सोडले .. पंतांच्या हातात सगळं सोपवून तो मोकळा झाला .. पंत वडिलांचे जिगरी दोस्त, दोन्ही कुटुंबात सलोखा .. घराचं किंवा आवारात काही काम निघालं की तो पंतांना पैसे पाठवून द्यायचा .. वाड्याच्या भिंतीवरून हात फिरवताना आई पाठीशी उभी असल्याचा भास झाला शशिलख.


स्वैपाकघर पाहून मिराला आपले जुने दिवस आठवले .. चूल मात्र अजून तशीच देखणी होती .. तिलाही गहिवरून आलं .. दोन्ही मूलं आपल्या या पडक्या वाड्यात सुद्धा वैभवात असल्यासारखी आनंदाने फिरत होती .. हे आपलं आजोळ आहे, हेच त्यांना भावलं होत ..


दोन्ही मुलांना हे वातावरण नवीन होतं .. मुंबईत फ्लॅट संस्कृतीत शेजारी काय घडलंय हे कुणाला कळत नसायचं .. मेलेल्या भावना आणि निर्जीव मनं, कर्तव्य म्हणून सगळ्या गोष्टी .. आपुलकीचा लवलेशही नसायचा .. सोशल मिडिया मध्ये गुरफटलेली आयुष्य, हेच होत .. आणि इथे .. केवळ मनाचे ऋणानुबंध म्हणून पंत कित्येक वर्षे त्यांच्या घराची राखण करत होते .. कसलीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता .. दादांचा मुलगा आलाय हे कळल्यावर गावकरी येऊन येऊन आपलेपणाने चौकशी करत होते .. लागेबांधे नसलेल्या काकू त्यांच्यासाठी न थकता चहापाणी करत होत्या .. हा आपलेपणा ती मूलं पहिल्यांदा पहात होते .. जगात अशीही माणसं आहेत, हे नव्याने अनुभवत होते .. नव्याने काहीतरी शिकत होते ..


रात्री दिव्याच्या प्रकाशात पडका वाडा सुद्धा दिमाखात उभा असल्यासारखा भासत होता .. रात्री अंगणात बसून शशी आपल्या वाड्याकडे प्रेमाने बघत होता .. आपलं बालपण, खेळ, मस्ती, आईसोबत देव्हाऱ्यात दिवा लावतानाच शुभंम करोती, दादांसोबत माळावर फिरायला जाणं, मित्रांसोबत विहिरीत आणि समुद्रावर पोहायला जाणं, सगळं त्याला दिसत होतं .. त्याची मूलं त्याच्याजवळ येऊन बसली .. तो मुलांना वाड्यात घडलेल्या आणि आपल्या बालपणाच्या गोष्टी सांगायला लागला ..


मीरा काकूंना स्वैपाकघरात मदत करत होती .. सगळं ऐकताना शशीच्या मुलाने मधेच आपल्या वडिलांना थांबवले आणि म्हणाला, "बाबा, हे आपलं वडिलोपार्जित घर आहे ना ! मग त्या घरासाठी आपली काही जबाबदारी आहेच ना .. दोन महिन्यांनी माझ्या परीक्षा संपतायत .. हा आपला वाडा आपण नव्याने बांधू .. मी स्वतः इथे या पंत आजोबांकडे येऊन राहीन .. मी देखरेख करेन .. हे माझ्या आजोबांचं घर आहे, त्यात आजी आजोबांच्या, तुमच्या बालपणीच्या आठवणी आहेत .. मी जपून ठेवीन .. हि वास्तू मी सांभाळीन .. मी वारसा पुढे नेईन .." कन्याही बोलली, "हो बाबा, तिथे शहापुरला त्या टू रूम किचन मध्ये 2 दिवस जायच्या ऐवजी मला सुद्धा इथे जास्त आवडेल, मीही दादाच्या मदतीला इथे येईन, मलाही आजीसारखं अंगणात सडा टाकून रांगोळी काढायची आहे"..


आपल्या मुलांचे ते शब्द ऐकून शशीला गहिवरून आलं .. अनवधानाने या आनंदापासून आपण आपल्या मुलांना लांब ठेवलं, याचंच त्याला दुःख होत होत ..


पडवीत बसलेले पंत दांपत्य आणि मीरा यांच्या डोळ्यात पाणी आले .. शशीने आणि त्याच्या कुटुंबाने वाडा नव्याने बांधायचा, हे पक्के ठरवलं .. दोन दिवसासाठी आलेले ते अजून चार दिवस राहिले .. वाडा बांधण्यासाठी सगळ्या गोष्टी नीट ठरवल्या .. गावभर हिंडून, समुद्रावर फिरून ते सगळे पुन्हा एकदा त्या मातीत विरघळून गेले .. याचा सगळ्यात जास्त आनंद झाला तो पंतांना ..


शेवटी आपलं गाव ते गाव .. आपली माती ती .. आपल्या माणसाला ओढ लावतेच .. दूर देशी गेलेली आपली पिल्लं कधीतरी घरट्यात परत आणतेच .. खरंच मुंबईत या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात आपलं आयुष्य जगत असतोच आपण .. पण आपलं खरं आयुष्य आहे ते आपल्या लाल मातीत .. इथे कोकणचे उदाहरण दिलंय .. प्रत्येकाचे गाव असतेच .. गाव कोणतंही असो आपली नाळ तिथेच बांधलेली असते .. प्रत्येकाला आपल्या गावाचा, आपल्या मातीचा अभिमान मनापासून आणि मनातून असायला हवा, नाही का ..!!!


लेखक: अज्ञात...

🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks