आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in अदृश्य प्रेम.... Adrushya prem Audiostory mp3 marathi Audiobook Love Story

अदृश्य प्रेम.... Adrushya prem Audiostory mp3 marathi Audiobook Love Story

 एकदा एक देखणा उमदा तरुण कवी एका महाराणीच्या विश्रामकक्षात कविता सादर करायला आला.

महाराणीकडे बघून त्याने काही अत्यंत उत्कट प्रेमकविता सादर केल्या.

त्या कविता ऐकून महाराणी त्याच्यावर खूप खुश झाली.

नंतर तिच्या दासी निघून गेल्यावर तो कवी अत्यंत आर्जवयुक्त स्वरात बोलला,

"गुस्ताखी माफ करणार असाल तर मनातली एक गोष्ट आपणाला सांगू का ?"

महाराणीने त्याला अनुमती दिली.


"आपण खूप चांगल्या आहात, सुस्वरूप आणि देखण्याही आहात. आपण मला खूप आवडलात. माझे आपल्यावर पाहताक्षणी प्रेम बसले आहे. माझ्या प्रेमाचा तुम्ही स्वीकार कराल का ?... बदल्यात तुम्ही माझ्यावर प्रेम केलेच पाहिजे असे काहीही नाही....एखादा स्नेही जसा आपल्याला एखादा गुलाब देतो किंवा एखादा मित्र आपल्याला भेटवस्तू देतो तसे मी माझे प्रेम आपल्याला देऊ इच्छितो, तेही कोणत्याही परताव्याशिवाय ! आपण माझे प्रेम घ्याल का ?"

कवीने अचानक विचालेल्या अनपेक्षित प्रश्नाने महाराणी पुरती गोंधळून गेली. काही क्षणांत तिने स्वतःला सावरले.


आपल्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणत ती बळेच उत्तरली- "माझे तर लग्न झालेले आहे!"

कवी उत्तरला - "त्याने काय फरक पडणार आहे ? तुम्हाला फक्त स्वीकार तर करायचा आहे !"

त्या प्रतिभावंत तेजस्वी कवीचे ते लाघवी बोलणे ऐकून महाराणी तिच्या नकळत गालात हसत उत्तरली, "मान्य ! पण मला मुले आहेत, मुली आहेत आणि त्यांची देखील अपत्ये आहेत. आता मी परिपक्व झालेय आणि कदाचित मी वयस्कही झालेय .."

महाराणीच्या गालावर पडलेल्या खळीकडे अनासक्त कुतूहलपूर्ण नजरेने बघत कवी बोलला - "असू द्यात. त्याने फरक पडत नाही... वयाचे थोडेच बंधन असते का ? तुमची अपत्ये देखील कोणावरतरी प्रेम करत असतील ना .."

महाराणी बोलल्या - "या राज्याच्या महाराजांचेही माझ्यावर प्रेम आहे आणि माझेही त्यांच्यावर प्रेम आहे. मग तुमच्या प्रेमाला मी कसे स्वीकारू ?"


कवी मंद स्मित करत उद्गारला - "प्रेमाला नात्याचे नावच द्यायला हवे असे काही नाही... माझ्या मनातले मूक प्रेमभाव मी व्यक्त केले नसते तर मला चुटपूट लागून राहिली असती. आता मी व्यक्त झालोय. कुणा एकावर प्रेम करणे किंवा कुणा एकाने आपल्यावर प्रेम करणे ही भावनाच जगणं श्रेष्ठ करून जाते. भूक, तहान, जिज्ञासा, आस्था, स्नेह, माया, लोभ या जशा भावना आहेत तशीच प्रेम ही देखील एक भावनाच आहे. अशा भावनाच आपल्याला जगण्याचा आधार शिकवून जातात पण त्यात गुंतूनच पडायला पाहिजे असे काही नाही. प्रेम आपल्याला जगण्याचा आधार देतं, ते दोन्ही बाजूने स्वीकारले गेले असेल तर आधाराचं रुपांतर आनंदात होतं. हा आनंद अन्य भावनातून देखील मिळवता येतो. मात्र फक्त प्रेमाच्याच भावनेत गुंतून राहिलं तर कदाचित आयुष्यभर वेदनाच हाती लागतात. हे मला ठाऊक आहे म्हणून मी व्यक्त झालोय. आता तुम्ही स्वीकारले वा अव्हेरले तरी त्याचा माझ्या जीवनावर खूप मोठा फरक पडणार नाही ..."


कवीने विशद केलेली प्रेमाची भावना ऐकून महाराणी काही क्षण विचारात पडली. पुढच्याच क्षणाला स्वतःला सावरत ती उत्तरली - "वाह कवीराज ! किती छान समजावून सांगितलंत तुम्ही ... मी एक संसारीक स्त्री ही आहे आणि महाराणीही आहे... त्यामुळे योग्य वेळी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन... आता तुम्ही येऊ शकता !"

महाराणीच्या उत्तरावर खुश होत कवीने मंद स्मित केले आणि महाराणीला वंदन करून तो तिथून बाहेर पडला. जाताना महाराणीने त्याचा उचित सन्मान केला.


काही दशके लोटली. एका पौर्णिमेच्या रात्री त्या कवीच्या स्वप्नांत ती महाराणी आली आणि ओलेत्या डोळ्यांनी त्याला म्हणाली, "असे होऊ शकणार नाही का, की अन्य एका मनुष्य जन्मी तू मला भेटशील, तेंव्हा तुझ्या प्रेमाच्या बदल्यात मी तुला प्रेम देऊ शकेन आणि तेंव्हा माझे वय सत्तर वर्षांचे नसेन !"

त्या अनपेक्षित स्वप्नाने कवी दचकून जागा झाला, त्याच्या मनात अनेक विचार आले. शेवटी दृढ निश्चय करून सकाळ होताच महाराणीच्या राज्याच्या दिशेने त्याने कूच केले.

काही दिवसांत तो त्या नगरराज्यात दाखल झाला तेंव्हा त्याला तिथल्या रयतेकडून कळाले की, पौर्णिमेच्या रात्री वयाच्या सत्तराव्या वर्षी महाराणींचे देहावसान झालेय !


कवीला या गोष्टीचे दुःख झाले आणि काहीसे आश्चर्यही वाटले. न राहवून तो राजदरबारी गेला तेंव्हा नव्या राजाने त्याला निकट बोलावले.

त्याची वास्तपुस्त होऊन ओळख लागताच महाराणीने त्याच्यासाठी वीस वर्षापूर्वी लिहून ठेवलेला बंद लिफाफ्यातला एक खलिता त्याच्या स्वाधीन करण्यात आला. त्या नंतर त्याचा सन्मान करून त्याला तिथून विदा केले गेले.


घरी परत आल्यावर थकलेल्या कवीने अधाशासारखा तो लिफाफा खोलला. त्यातील खलिता वाचल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटले कारण राणीने स्वप्नात येऊन जे सांगितले होते तोच आशय त्या पत्रात होता. स्वतःच्या प्रेमाच्या सच्चेपणाचा त्याला त्या दिवशी मनस्वी अभिमान वाटला आणि त्याचे डोळे एकाच वेळी दुःखाश्रू आणि आनंदाश्रूने भरून आले.


खऱ्या प्रेमाचा स्वीकार होवो वा अव्हेर होवो त्याची अभिव्यक्ती होणे गरजेचे असते. एखादी व्यक्ती आवडणं आणि तिच्यावर आपण प्रेम करणं हे नुसतं व्यक्त जरी केलं तरी त्यातून मिळणाऱ्या तृप्ततेतून जीवन व्यतित करता येते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks