आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in खंत नसणारं खाचखळग्यांचं आयुष्य..! aayushya Audiostory mp3

खंत नसणारं खाचखळग्यांचं आयुष्य..! aayushya Audiostory mp3

खंत नसणारं खाचखळग्यांचं आयुष्य..!


- आर. टी. मण्णूर

सर्वसामान्यपणे या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला आपण कोण आहोत? हू अ‍ॅम आय? आपल्याला काय करायचं आहे? काय अनुभवलं, काय केलं, हे या ना त्या मार्गानं सौम्यपणे ओरडून किंवा डरकाळय़ा फोडून सांगायची इच्छा असते. मग त्यासाठी वेगवेगळे मार्ग स्वीकारणं क्रमप्राप्त.

रवींद्रनाथ टागोर यांचं सुप्रसिद्ध वाक्य आहे- ‘आपलं आयुष्य हे कधी सरळ रेषेत असू नये. ते अनेक चढ-उतारांचं आणि नागमोडी वळणाचं असलं, तरच परिवर्तन घडतं.’ जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास कसा करायचा, हे प्रत्येकानं ठरवायचं. परंतु मुळातच अशी नैसर्गिक जाण किंवा समज नसेल, तर मात्र ते आयुष्य कंटाळवाणं होतं. ज्यांना अशी निसर्गसुलभ प्रगल्भता असते, त्यांना आयुष्याचा अर्थ लहान वयातच गवसतो. उर्वरित लोक आयुष्यभर गटांगळय़ा खात राहतात.

असं म्हणतात, की मनुष्य जसा विचार करतो तसा तो घडतो, त्याचं आयुष्य घडतं. आयुष्याचा अर्थ या विचारातून स्पष्ट होतो. आपण जेव्हा सकाळी उठतो, त्या वेळेस आपल्या मनात जे काही विचार उमटतात त्याप्रमाणे आपला दिवस व्यतीत होतो. 

‘जसा तू विचार करीशी तसा तू स्वत:स घडविसी’


हरवलेल्या वस्तू परत सापडू शकतात, परंतु निसटलेलं आयुष्य पुन्हा जगता येत नाही. म्हणूनच, ‘उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै:।


न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:।।’



अर्थात कार्य केवळ मनोरथांनी नव्हे, तर ते प्रत्यक्ष केल्यानंच होतं. ज्या क्षणी आयुष्याचा नेमका अर्थ लागत नाही, तेव्हा आपलं मन घडय़ाळाच्या लंबकाप्रमाणे इकडून तिकडे म्हणजेच नैराश्य आणि उत्साह यांच्या दरम्यान झोके घेत असतं. आपण वाचलंच असेल, की अमृता प्रीतम यांनी ‘रसीदी टिकट’ हे आत्मवृत्त लिहिण्यापूर्वी लेखक खुशवंत सिंग यांच्याकडे तो विचार बोलून दाखवला असता खुशवंतजी त्यांना म्हणाले होते, की ‘तुझं आयुष्य ते काय? सांगण्यासारखं तुझ्याकडे आहे काय? तुझं आयुष्य रेव्हेन्यू स्टॅम्पच्या पाठीमागेही लिहून होईल.’ अशा अर्थाचा विचार आपल्याही मनात येतो. परंतु शून्यातून निर्मिती कशी करायची या विचारानं प्रेरित होऊन विचारचक्र फिरायला लागतं.


मग छोटय़ा छोटय़ा घटनांतून आपलं व्यक्तिमत्त्व विकासित कसं होऊ लागलं, हे आठवायला लागतं.


अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ‘आयुष्याविषयी लिहिण्याआधी तुम्हाला जगणं शिकायला यायला हवं.’ मला वाटतं, की वयाच्या ८३ व्या वर्षी हा अधिकार मला प्राप्त झाला आहे. जेव्हा आपण लहान असतो, तेव्हा आपलं जगच वेगळं असतं. आपल्याला येणाऱ्या अनुभवांतून हळूहळू आपण घडत जातो. साधारण दहा-अकरा वर्षांचा असताना आम्ही चिंचवड स्टेशनवरील रेल्वे क्वार्टर्समध्ये राहात होतो. त्या काळी, म्हणजेच पन्नासच्या दशकात तुरळक रेल्वेगाडय़ा धावायच्या. शाळेच्या व्यतिरिक्त आम्ही मग या रेल्वेगाडय़ा बघण्यासाठी फलाटावर जात असू. फलाटावर नुकताच एक चहाचा स्टॉल झाला होता. त्या स्टॉलवरील काचेच्या बरणीतली बिस्किटं आणि मिठाई बघून आमच्या तोंडाला पाणी सुटायचं.


खिशात पैसे नसायचेच. अशा वेळी आमची अवस्था बघून स्टॉल मालकालाच दया आली असावी. त्यानं आमच्यासमोर एक प्रस्ताव मांडला, की गाडीवर तुम्ही जाऊन हे खाद्यपदार्थ विकल्यास तुम्हाला मी फुकट खायला देईन. आम्हाला तो प्रस्ताव मान्य होऊन आम्ही खाद्यपदार्थ विकण्यास सुरुवात केली. या अनुभवातून आम्ही शिकलो, की जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. या अनुभवाचा पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. एका अर्थानं आयुष्याचा ‘अर्थ’ समजला


दुसरा अनुभव असा, की त्या वेळी चिंचवड स्टेशनवरून हिरवा मटार, भुईमूग, बोरं वगैरे मुंबईला रवाना होत. हुंडेकरी रात्रीच्या वेळी पोती आणून ठेवत. अंधाराचा फायदा घेत त्या पोत्यांवर बसून आम्ही हळूच एक एक भुईमुगाची शेंग आणि मटार खात असू. याच वेळी साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’चं गारूड मनावर संस्कार करत होतं. त्यामुळे अशा प्रकारे चोरून काही खाल्ल्यास आपल्या आई-वडिलांचं नाव बदनाम होईल, असं वाटून आम्ही ते चोरून खाणं बंद केलं. एवढंच कशाला! बिनादमडी, अंगावरच्या वस्त्रानिशी घराबाहेर चार-आठ दिवस पडून काय अवस्था होते, हेही प्रयोग म्हणून करून अनुभवलं. 


मॅट्रिकच्या वर्षांला असताना ऐन परीक्षेच्या आधी आमच्या एका वर्गमित्राच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. तरीही तो मुलगा बोर्डात दुसरा आला होता. पुढे हाच मुलगा इंजिनीअिरगच्या प्रथम वर्षांत नापास झाला, पण ‘आयएएस’ व ‘आयएफएस’ परीक्षेत उत्तमरीत्या उत्तीर्ण झाला. त्याच्या ‘राइज टू द ऑकेजन’ या ‘अ‍ॅटिटय़ूड’मुळे आम्हीही सगळे नकळत कणखर वृत्तीचे झालो.


 एवढं असूनही आयुष्य मात्र खाचखळग्यांनी भरलेलं आहे, पण त्याची खंत वाटत नाही. पोटी कर्णबधिर मुलगा जन्मल्यानं सुरुवातीला खूप निराश होऊन मग त्यावर मात करत त्याला त्याच्या पायावर उभं करण्यात खूप काही करावं लागलं. पुढे सूनही तशीच मिळाल्यामुळे जबाबदारी आणखीनच वाढली. या असामान्य अनुभवामुळे आयुष्याचा अर्थ हळूहळू गहिरा होत गेला. त्यामुळेच की काय, करोना महासाथ आणि वृद्धत्वामुळे जराही असुरक्षित वाटत नाही. शेवटी आयुष्य काय आहे? 


सकाळी हसतमुखानं उठणं, व्यग्र दिनक्रम ठेवत रात्री अंथरुणात पाठ टेकताच झोप लागली, तर आयुष्याचा अर्थ गवसला असं समजायचं. भविष्यात पश्चात्ताप होऊ नये म्हणून आजच चांगलं कृत्य करावं. नैराश्याच्या गर्तेतून ‘बाउन्स बॅक’ करत पुन्हा समाधानी आणि यशस्वी आयुष्य उपभोगणं म्हणजेच आयुष्याचा अर्थ समजणं होय. घडय़ाळाच्या लंबकाप्रमाणे हेलकावे खाण्याचे प्रसंगही खूप आले. पण ‘नो रिग्रेट्स’.


  एकदा आखाती नोकरीच्या मुलाखतीसाठी चुकून मी वरळीच्या पत्त्यावर गेलो. बघतो, तर ऑफिस बंद होतं. मी मला आलेल्या तारेवरचा मजकूर पुन्हा वाचला तर कळलं की वाळकेश्वरला मुलाखत आहे! उशीर झाला होता. पण तरीही नशीब अजमवावं म्हणून अधिक विलंब न करता टॅक्सीनं वाळकेश्वरला गेलो आणि मुलाखत फत्ते होऊन मी मस्कतला रवाना! 


‘आगे बढते रहो’ हा संदेश मला या अनुभवातून मिळाला. आजमितीस, निवृत्त होऊन बावीस वर्ष झाली. या काळात सुरू केलेली ‘सेकंड इिनग’ अजूनही चालू असून ‘लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन’चा चांगला अनुभव येतो. समोरून काम मिळत राहतं. 


  मागे वळून बघताना, डोंगराएवढी संकटं येऊनही आपण ताठपणे उभे राहू शकतो हे बघून समाधान आणि शांतता वाटते. अजून काय हवं असतं! काय नाही मिळवलं, यापेक्षा काय मिळालं, असं मानलं तर आयुष्याचा अर्थ समजतो. जन्म आणि मृत्यू यांना जोडणारा सेतू म्हणजे आयुष्य. हा प्रवास कसा करायचा हे ज्याचं त्यानं ठरवावं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks