विश्रांतीचा अपराध....
स्त्रीला निसर्गतः विश्रांतीची गरज असते. ती दुबळी नसते पण तिची यंत्रणा वेगळया पध्दतीनं काम करत असते. एक तास अभ्यास करुन 60% मिळत असतील तर दोन तास अभ्यास करुन 120% मिळणार नाहीत, हे आपल्याला कधी कळणार ?
पुरुषांकडे पाहून तुलना करत स्वतःला आळशी समजणं म्हणजे स्वतःला त्रास देणं आहे. पुरुषाच्या वेळापत्रकात मासिकधर्म नाही, त्याच्या आयुष्यात बाळंतपण नाहीत, मुलांची 'आई' होणं नाही, तरीही विश्रांती घेताना मात्र स्त्रीच्या मनात अपराधीभाव असेल तर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे.
स्त्री हक्कांसाठी लढता लढता विश्रांतीचा हक्कच दुर्लक्षित राहिलाय. कदाचित सुपरवुमन होण्याच्या नादात तिचं स्वतःचंच दुर्लक्ष झालंय. बिरबलाच्या गोष्टीतल्या बाभळी आणि बोरी वेगळया असतात हे विसरुन इतरांना काॅपी करताना स्वतःच्या गरजा, मर्यादा, वेगळेपण ती विसरतेय.
सेलिब्रिटिजवरचे सिनेमे, सोशल मिडियावरचे मोटिवेशनल स्पिकर यशाचे फाॅर्म्युले सांगत असतात. या जगात कष्टाचे गोडवे गाण्याची जुनी प्रथा आहे. सहज यश मिळालं म्हटलं की, त्यात मजा नसते, ड्रामा नसतो.
टिव्हीवरचे रियालिटी शोज बघा. घरची गरीबी दाखवून कलेला फ्रेम केलं जातं, का?
कलाकार हा कलाकार असतो त्याच्या बॅकग्राऊंडशी तुम्हाला काय करायचंय ? पण नाही !
आपल्याला साधं सरळ यश पचत नाही. आपण यशाचा संबंध टाॅर्चरशी जोडलेला आहे, मग तसंच आपल्या अंतर्मनाचं प्रोग्रॅमिंग होतं.
आपण इतरांचं पहातो. लाॅ ऑफ अट्रॅक्शननुसार कष्ट आणि अडचणी मागतो मग यश मिळाल्यावर ते दु:ख मिरवतोसुध्दा ! आपलं मन सहज सोपा मार्ग नाकारतं हे अनकाॅन्शस लेवलला चाललेलं असल्यानं आपल्याला कळतही नाही. परत प्रश्न विचारत फिरतो की माझ्या मार्गात इतक्या अडचणी का आहेत?
कारण बिलिफ, मनात खोलवर रुजलेलं कष्टाचं व्यसन !
यशस्वी लोकं जे बोलतात ते पुर्ण नसतं. बाह्यमन 10% असतं, अंतर्मनाचं गूढ 90% असतं. मग यशाची सूत्रं विचारली की ते कष्ट सांगतात. त्यांनी स्वतःवर प्रेम केलं, स्वतःला महत्व दिलं, हवा तेव्हा आराम केला हे अस सांगतील तर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवेल? मी सहज गेले आणि जिंकले अस म्हटलं तर कोण ऐकेल? आपल्याला वेदना ऐकायच्या असतात. डोळयात पाणी आलं पाहिजे.
का? तर उद्या आपल्याला पळ काढायचा असेल किंवा अपयश आलं तर आपले कष्ट कमी पडले असं म्हणता यावं. कारण अहंकार स्वतःचे दोष तर पहातच नाही तो शरीराला दोष देऊन मोकळा !
ऐकलंय कधी पालकांना बोलताना, मुलगा / मुलगी हुशार आहे हो, फक्त कष्ट कमी पडतात !
दुसरं
आपला न्यूनगंड आपल्याला सुखानं बसू सुध्दा देत नाही. माझी किंमत मला काम करून सिध्द करावीच लागेल. तरच मी worthy आहे असं आपल्याला वाटतं. यु ट्युबवरचे स्त्रियांचे व्हिडियो पहा, तव्याच्या काळया कडा कशा चमकवायच्यापासून अमक्यापासून तमुक तयार करण्याचे भरमसाठ DIY आहेत. मुलांच्या संगोपनावर तर आयुष्य संपलं तरी शिकणं संपत नाही इतका आईला गिल्ट असतो.
आपण चांगली आई नाहीच असं वाटत असतं.
कधी विचार केलाय? का? कशासाठी?
कारण स्वतःबद्दल खोलवर मुरलेला न्यूनगंड ! मी गृहिणी आहे तर आहे, आराम करतेय, मला नाही येत एखादी कला, नाही जमत इतरांसारखं. काय हरकत आहे साधं रुटीन आनंदानं जगायला?
आयुष्यभर सासरचं केलं माहेरचं केलं मुलं शिकली यशस्वी झाली. धाव धाव धावले आता आणखी काय?
अजूनही किंमत कुठे आहे? आता मी सोशल मिडियावर पाहीन कुणी गृहउद्योग करतेय, कुणी कला शिकतेय, कुणी.....
आता मी स्वतःला फटके मारेन, स्वतःला युसलेस म्हणत परत धावायला सुरुवात करेन. त्याला स्वतःची ओळख वगैरे छानसं नाव देईन आणि दमलेली थकलेली परत नवी रेस शोधून काढेन. ताजं फ्रेश दिसण्यासाठी मेक्अप करेन, हसेन.
Stop ! कुठेतरी हे थांबवा, स्वतःला फसवणं.
आपल्याला इतरांच अप्रूवल हवं असतं सारखं काहीतरी करुन. त्यासाठी आपण गिल्ट न बाळगता निवांत बसतही नाही, शांत बसून शरीराला आराम देणंच आपल्याला माहीत नाही.
असच नुसतं बसायचं दहा मिनिटं ?असं कसं ?
ध्यान करु, मंत्र म्हणू पण काहीतरी करु !
सतत काहीतरी केलंच पाहिजे या प्रोग्रॅमिंगमधून आपण बाहेर पडलं पाहिजे.
शरीराचं ऐकलं पाहिजे ते बोलत असतं अंग दुखतंय कंबरेत वेदना आहे. खांदा ठणकतोय... ते एका लहान मुलासारखं आई आई ...करतंय पण आई लक्ष देत नाही. एक दिवस ते टाहो फोडतं जोरात रडतं. शरीराचा आक्रोश म्हणजेच आजारपण !
तेव्हा शरीराकडे लक्ष जातं, औषधाचा पैसा खर्च करुन आपण विकत काय घेतो तर सक्तीची विश्रांती !
बरं होऊन आपण परत त्याच जुन्या कामाला लागतो.
*आराम करता आला पाहिजे. लेख वाचणा-या प्रत्येकीला गिल्ट फ्री विश्रांतीच्या शुभेच्छा...* 👍🏻👍🏻 💐💐
0 टिप्पण्या