जगण्याची उमेद...!
भुलीचं इंजेक्शन देऊन मी हातात ब्लेड घेतलं तेव्हा तो म्हणाला, "डॉक्टर, फी कमी करा की थोडी!"
"आधीच एवढी कमी सांगितलीय त्यात आणखी कमी?"
"हो!... आणखी थोडी कमी!"
"म्हणजे किती कमी?"
"वीस टक्के कमी."
"चालेल, तू म्हणशील तसं!... बाय द वे, काय करतोस तू?"
"इंजिनिअरिंगला आहे, तिसऱ्या वर्षाला."
"कुठल्या कॉलेजात?" त्यानं कॉलेजचं नाव सांगितलं.
मी आता माझं काम सुरू केलं होतं. त्याच्या पायावर ब्लेडनं मी एक छेद घेतला तोपर्यंत त्याचा प्रश्न, "डॉक्टर, ते अमके अमके साहेब तुमच्या ओळखीचे आहेत ना हो?"
"हो आहेत की!.... अगदी जवळचं रिलेशन आहे आमचं."
"तरच.. ते नेहमी तुमच्याविषयी बोलत असतात... आजही त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलंय."
"पण तुझी आणि त्यांची कशी काय ओळख?"
"माझी आई त्यांच्या घरी गेली आठ वर्षे स्वयंपाकाचं काम करते... आणि रोज सकाळी मीही त्यांचा बंगला साफ करायला जात असतो."
"पण तू कॉलेजला आहेस ना?"
"सकाळी लवकर त्यांचा बंगला झाडतो आणि मग कॉलेजला जातो."
"भारी आहेस की!" मी त्याच्या पायातली गाठ काढता काढता म्हटलं.
"सुट्टीदिवशी लग्नात वाढप्याचं काम करायलाही जातो मी...... कधी कधी नवऱ्या मुलीचा मेणाही उचलतो!"
"काय सांगतोस?"
"हो तर!... तेवढेच चारपाचशे रुपये सुटतात."
आणि तिथं कॉलेजमधली एखादी मुलगी भेटली तर?" मी डोळा मारत त्याला विचारलं.
"भेटली होती मागच्याच रविवारी." तो हसला.
"मग रे? लाज वाटली असेल की तुला!
"छे छे! मीच तिला 'तुझ्या लग्नातही डोली उचलायला मलाच बोलाव गं!' म्हणून मोठ्यांदा आवाज दिला तर तीच लाजली."
"ग्रेट आहेस गड्या तू!"
"काम करायला काय लाजायचं सर?.... तुम्ही तर एवढे मोठे डॉक्टर असून आमच्या कसल्या कसल्या जखमा साफ करताच की!"
मी त्याच्या जखमेवर पट्टी बांधली. धनुर्वाताचं इंजेक्शन दिलं. "निघ आता. बाहेर गर्दी झालीय." सीसी टीव्ही बघत मी म्हटलं.
"डॉक्टर फी?"
मी फी सांगितली.
"निम्मीच?... मी तर तुम्हांला वीस टक्के कमी करायला सांगितली होती..."
असूदे रे!... शिक्षण घेण्यासाठी तू एवढा धडपडतोयस तर तुझ्या धडपडीत माझ्याही धडपडीची थोडी भर."
असे प्रसंग रोज रोज येत नाहीत. ते असतातही छोटे. पण जगण्याची उमेद देऊन जातात.... आणि कामाचं समाधान.
0 टिप्पण्या