🤞एका बँक मॅनेजरची गोष्ट सांगतो. मोठ्या पदावर असलेला हा बँक मॅनेजर ! एक पत्नी व तीन मुले असा सुखी संसार. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्याने आयुष्याची घडीदेखील वडिलांनी योग्य प्रकारे बसवलेली. मुले मोठी होतात. त्या तिघांचीही लग्न होतात. तिघेही मुले नोकरीच्या निमित्ताने विविध शहरात राहायला जातात. वडीलही इकडे तोवर निवृत्त होऊन पत्नीसह मूळ शहरात राहत असतात. मात्र वडिलांनी एक नियम घालून दिलेला असतो की, वर्षातून एकदा, दिवाळीला सगळ्यांनी एकत्र यायचच यायच ! मुलेही ते आनंदाने मान्य करतात. आणि मग प्रत्येक दिवाळी आनंदाच्या प्रकाशात उजळून निघू लागली. मुले, सुना, नातवंडांनी घर त्या काळात भरून जायचं. दिवाळीचे चार दिवस कसे भुर्रकन संपले हे कळायच देखील नाही. असं सगळं मजेत सुरु असत ! मात्र का कोण जाणे या सुखाला जणू दृष्ट लागल्यासारखं होत अन अचानक एके दिवशी त्या मुलांची आई हार्ट अटॅकने मृत्युमुखी पडते. वडील सैरभैर होतात. हि बातमी कळताच मुलं सुना सगळे धावत येतात. रिवाजाप्रमाणे आईचे अंत्यसंस्कार केले जातात. संध्याकाळी सगळे मिळून हॉल मध्ये बसलेले असताना धाकटा मुलगा म्हणतो, "आता आई गेली, तुम्ही इथं या मोठ्या घरात एकटे कसे राहणार? आमच्यासोबत चला. माझ्या घरी राहा." धाकटी सूनही त्याला होकार देते. मात्र वडील नकार देत म्हणतात, "माझ्या सगळ्या आठवणी या घराशी निगडित आहेत. तुमच्या आईचा सहवास लाभलेले सगळे क्षण इथल्या वास्तूत भरून राहिलेले आहेत. ते सोडून दुसरीकडे माझं मन रमणार नाही."यावर सगळे गप्प होतात.
✊शांततेचा भंग करत वडील सांगू लागतात की, "मुलांनो, माझी संपत्ती माझ्यासाठी थोडी ठेवून बाकी तुम्हा तिघांमध्ये समान वाटून दिली आहे. त्याची कागदपत्रे तुम्ही ताब्यात घ्या. मात्र तुमच्या आईच्या दोन वस्तू आहेत. त्याची वाटणी कशी करू हे कळत नाहीय. एक म्हणजे तिचे सुमारे लाखभर रुपये किमतीचे सोन्याचा पट्टा असलेले नाजूक घड्याळ व दुसरं म्हणजे वेणीफणीचे शृंगारसामान ठेवण्याची चांदीची सव्वा लाखाची सुंदर पेटी आहे. वस्तू दोनच आहेत. अन तुम्ही तीन आहात. कशी वाटणी करू?"
👍क्षणभर सगळे शांत !! काय बोलावं कुणालाच सुचत नाही. शेवटी धीर करून धाकटी सून म्हणते, "सासूबाई मला नेहमी म्हणायच्या की, हे घड्याळ तुला मी नंतर कधीतरी देणार आहे. तोवर मी वापरत जाईन" तिच्या सुरात धाकटा मुलगाही सूर मिळवतो.
हे पाहून मधली सून पुढे येत म्हणते, "माझ्यानंतर माझी हि शृंगार पेटी मी तुलाच देण्याची व्यवस्था करणार आहे, असं सासूबाई मला बोलल्या होत्या" तिच्या म्हणण्यावर मधला मुलगाही होकार भरतो.
👉आता वडिलांची नजर थोरल्या सुनेकडे जाते की आता ती काय म्हणणार ? हे ओळखून थोरली सून हसून म्हणते, "मामंजी, मला लक्षात आलं की तुमच्या मनात काय आहे. पण तुम्ही दोनच बाबतीत बोलताय पण तिसरं पण एक अजून असं शिल्लक आहे जे या दोन गोष्टीपेक्षा अनमोल आहे. ते मला द्या."
🤞आता बाकी दोन सुना मनातल्या मनात विचार करतात की, आपल्याला माहित नसलेल तिसरं असं काय आहे ? जे या दोन गोष्टीपेक्षा अनमोल म्हणजे महागडं आहे? आता ती वस्तू थोरलीला जाणार हे पाहून या दोघी चरफडतात.
🤏वडील गोंधळात पडलेले पाहून शेवटी शांततेचा भंग करीत थोरली सून म्हणते, "सर्वात अनमोल तर तुम्ही स्वतः आहात मामंजी. सासूबाई मला म्हणाल्या होत्या की, माझ्या नंतर माझ्या पतीची काळजी घेणारी तूच योग्य आहेस. मायेने तू त्यांना सांभाळ! तर म्हणून मामंजी, तुम्हीच ते तिसरं आहेत. तुम्ही माझ्या घरी राहायला यायच आहे. 🤝माझे स्वतःचे वडील माझ्या लहानपणीच वारले त्यामुळे वडिलांची सेवा करायच राहून गेलं. ती संधी जणू देवाने मला तुमच्या रूपात दिली आहे. तेव्हा तुम्ही आमच्या सोबत राहायच आहे."
👍तिचे हे बोलणे ऐकून थोरला मुलगा भारावतो. वडिलांच्या डोळ्यातही पाणी येते.
🤝थोरल्या मुलाला घट्ट मिठी मारून वडील अश्रूंना वाट करून देतात.
0 टिप्पण्या