फक्त ५९ सेकंद!
तुम्ही ट्रॅफिक सिग्नलला तुमची गाडी उभी असताना लाल दिवा हिरवा होण्याआधी जे डिस्प्लेला सेकंद काट्याचे काउन्टडाऊन सुरू होते ते बघता का? मी बघतो. मला मजा येते. तेवढाच काहीतरी बालिश टाईमपास!
अशीच एक सकाळची वेळ! चौकात आमची कंपनीची बस सिग्नलला लागली होती. ५९ सेकंदाचा आमचा हॉल्ट होता.
सिग्नल लागल्या लागल्या रस्त्याच्या बाजूला असणारी दुतर्फा चालती फिरती दुकाने जागी झाली, जिवंत झाली! फळे, फुगे, गजरा, खेळणी विकणारे आमच्या गाड्या समोरून धावू लागले. भिकारी भीक मागू लागले. या सगळ्यात ते दोघे होते.
त्यात ती मोठी होती, तो लहान होता!
ती मोठी म्हणजे जास्त मोठी नाही, दहा बारा वर्षांची!
तो लहान म्हणजे अगदी लहान नाही, सात आठ वर्षाचा!
बहीण भाऊ असावेत!
दोघे गजरा विकत होते!
टोपली बहिणीकडे होती. तिचे काम खूप चपळतेने होत होते कारण त्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी अर्थातच तिच्याकडे होती. ती त्या ५९ सेकंदाचा पूर्ण वापर करत प्रत्येक गाडी, रिक्षा, बस समोरून धावत होती. मध्येच थांबून विचारेल त्याला गजरा दाखवत होती, भाव सांगत होती, पैश्याची घासाघीस करत होती. मध्येच एखादा गजरा देऊन पैसे टोपलीत टाकत होती, परत पुढे पुढच्या गाडीकडे पळत होती.
त्यामानाने तिचा लहान भाऊ सौम्य होता. त्याच्या हातात तिने सहज दोन तीन गजरे दिले होते. तो आपला प्रत्येक गाडी समोर जाई. ते हातातले दोन तीन गजरे दाखवे, नजरेनेच हवे का विचारे, परत पुढे पुढच्या गाडीकडे जाई. मध्येच वळून वळून आपल्या बहिणीकडे पाही.
वेळ सरकत होती. तिने आतापर्यंत तीन गजरे विकले होते, त्याने अर्थात तोपर्यंत एकही नाही!
आमच्या बस समोर एक स्कूटी होती. त्यावर दोन तरुण मुली बसल्या होत्या. त्यात मागे बसणाऱ्या मुलीकडे तो मुलगा गेला. त्या मुलीला गजरा घेण्यात इंटरेस्ट नव्हता असे दिसत तर होते कारण ती त्याला नकार देत होती. पण तो मुलगा पुढे आमच्या बसकडे येणार इतक्यात तिने पुन्हा त्याला हाक मारली.
ते सहा वर्षाचं पोरं विजेच्या वेगाने तिच्याकडे धावत गेले. तिने भाव विचारला, त्यानें बोटाने दहा सांगितले. बहुतेक तो मुका होता!
ती ओशाळली. तिने पटकन पर्स मधून काढून त्याला दहा रुपये दिले आणि गजरा घेतला.
सिग्नल सुटायला दहा सेकंद बाकी होते!
त्या मुलाचा ते दहा रुपये पाहून आनंद गगनात मावेना! तो तोंडाने जमेल तितक्या जोरात ओरडून बहिणीला बोलवण्यासाठी "आँ, आं" करू लागला.
बहिणीने ते पाहिले. त्याची बोहनी आणि तो आनंद पाहून ती पण आनंदली. सिग्नल सुटणार होता हे तिच्या लक्षात होते. ती त्याला खुणेने "चल, आता बाजूला हो, गाड्या जातील, हे खुणावू लागली."
माझ्यासारखी कितीतरी माणसे त्या मुलाकडे पाहत होती. माझ्यासाठी ती स्कूटी वाली आदरार्थी आणि तो लहान मुलगा हिरो होता!
तेवढ्यात त्या मुलाच्या हातातली दहाची नोट पडली आणि सिग्नल सुटला!
गाड्यांचे स्टार्टर लागले. एक्सेलेटरचे आवाज वाढू लागले, हॉर्न वाजू लागले पण त्या मुलाला त्याची काळजी नव्हती. तो भर रस्त्यात ती उडणारी त्याची पहिली कमाई पकडायला जीवाच्या आकांताने धावू लागला - जीवाची काळजी न करता!
त्याची बहीण एव्हाना रस्त्याच्या कडेला बाजूला गेली होती. ती त्याला बोलवायला ओरडत होती. गाड्या हॉर्न वाजवत होत्या. पण तो मुलगा आपली उडणारी नोट पकडत होता!
तेवढ्यात...
ती समोरच्या स्कुटीच्या मागे बसणारी मुलगी उतरली. धावत धावत त्या मुलाकडे गेली. पुढे बसलेल्या मुलीने स्कूटी थांबवली, स्टँडला लावली. ती उतरली आणि आम्हा बाकीच्या गाड्यांना ' थांबा' असे खुणावू लागली. दुसरी, मागे बसलेली मुलगी त्या मुलाकडे धावत गेली. तिने चपळतेने त्याची हवेत उडणारी नोट धरली आणि त्याच्या हातात दिली.
Suddenly my heroes were changed!
क्षणार्धात त्या दोन्ही मुली माझ्यासाठी हिरो झाल्या!
पण त्यांचे दुर्दैव! त्या मुलाने त्या दोघींकडे पाहीले देखील नाही! तो नुसतीच दोन्ही हाताने ती दहाची नोट निरखून बघत कडेला आपल्या बहिणीकडे चालू लागला होता. ती स्कूटीवाली मुलगी एक हात त्याच्या पाठीवर ठेवत, दुसरा हात आमच्याकडे "थांबा" म्हणून दाखवत त्याला रस्त्याच्या कडेपर्यंत सोडून आली.
त्या भावाची बहीण टोपली सांभाळत पुढे धावत आली. तिने त्या भावाला हलकीच डोक्याला टपली मारली. त्या स्कूटी वाल्या मुलीच्या पाया पडू लागली. तिला टोपली तला अजून एक गजरा तिने ऑफर केला.
तिने हसत "नाही" म्हणून खुणावले. मागच्या आमच्या गाड्या खोळबल्या होत्या याची तिला जाणीव होती. ती धावत धावत स्कूटीकडे येऊ लागली. तिची मैत्रीण स्कूटी स्टँडवरून काढू लागली.
उसके बाद जो हुआ भाई सहाब.....
ती गजरेवाली मुलगी आता धावत रस्त्याच्या मध्यभागी आली. एक सेकंद स्तब्ध उभी राहिली!
आता मात्र माणसे चुळबुळ करू लागली, ओरडू लागली. "बाजूला हो, केली ना मदत" सांगू राहिली.
तिने फक्त आपल्या भावाकडे हात दाखवत आणि तोच हात आम्हा गर्दीकडे वर्तुळाकार फिरवत "तुम्ही मला मदत केली, माझ्या भावाला वाचवले" या मूक अर्थाने दोन्ही हात जोडत सेकंद दोन सेकंद कमरेपर्यंत वाकली आणि लगेच रस्त्याच्या बाजूला पळून गेली.
आता रस्ता खुला होता तरी गाड्या दोन एक सेकंद थांबल्या होत्या. भानावर येत येत एक एक गाडी सुरू झाली! पुढे जाऊ लागली.
त्या मुलीला खूप काही मिळाले त्या दिवशी!
स्कुटी वालीने तिला फ्लाईंग कीस दिले. बाईक वाल्यांनी, even आमच्या बस वाल्यांनी पण तिच्या बाजूने जाताना हॉर्न वाजवून तिची प्रशंसा करणारी मान हलवली. आमच्या सारख्या कित्येक लोकांनी तिला हात दाखवला.
*ती आनंदाने सगळ्यांना हात दाखवत होती!*
यावेळी मात्र माझा हिरो बदलला नव्हता! माझे हिरो अजूनही त्या स्कूटीवाल्या मुलीच होत्या - ती गजरेवाली मुलगी नाही!
*कारण ज्यांना हीरो वळून पाहतात ना ते legend असतात!*
तिने आम्हाला चांगुलपणात जिंकुच दिले नाही!
एक तो दिवस आहे आणि एक हा आजचा, मला कोणीही विचारलं ना की legend बनायला किती कालावधी लागतो तर मी इतकचं सांगेन,
*फक्त ५९ सेकंद!*
*Less than a minute!*. 🌸🌸🌸
0 टिप्पण्या